डोक्यावरचा उतरलेला चांद सांभाळीत
आजोबांनी सहस्रचंद्रदर्शन केले
तोंडाच्या बोळक्याला झोले देत म्हणाले
"जग सारं वेडं आहे "
ऐकणारे हसले, म्हातारा चळलाय म्हणाले
मग आजोबांनी तंबाखूचा बार भरला
पिंक टाकून म्हणाले," पिंके एवढेच आयुष्य,
टाकल्यापासून वाळेपर्यंत
तरिही ओघळते जगाच्या भिंतींवर
भिंतींच्या रंगाला साजेशी रांगोळी काढीत "
मग फोटो निघतात
क्वचित पारितोषिकेही मिळतात
तर कधी अपमानास्पद वागणूक मिळते
धिंड निघते सभ्यतेची
नाचवत सुटतात , जाळत राहतात
" सभ्यतेची छबी "
तरिही अस्भ्यताच जिंकते
असत्य हासते, ताई जिंकली म्हणून
आणि हातात हात घालून तिच्या
घराघरात घुसत सुटते
पालिकेच्या फ़वाऱ्यासारखी.
No comments:
Post a Comment