Thursday, September 2, 2010

लेकरु


अंगाई म्हणणारी आई
आता जूनी झाली
आयुष्याच्या संध्याकाळी
एका कोपर्‍यात दिसली.

सावलीसारखा बाप
ज्याच्या हातांचा होतो थरकाप
डोळे बंद करूनी
कंठाशी आणतो प्राण.

संसाराची दोन चाक
कशीबशी चालवत नेतो
दूर गावी शिकणार्‍या लेकरला
अर्ध्या ताटातून पूरवतो.

मोटेने पाणी ओढतो
शेतीची तहान भागवतो
उद्या लेकरू मोठ होईल म्हणून
रक्ताला घाम बनवतो.

अंगावरच फाटक कापड
उन्हापासून लपवत
गुडघ्या एवढ्या चिखलात
पायाखालची जमीन शोधत.

दोन तिरांवरचा अंधार
गाडी बैलाला जूंपतो
कॅनडा भाकर खाऊन
आजचा दिवस ढकलतो.

सणासूदीला पोर येत तेव्हां
उसंनपासन करतो
चार दिसांचा पहूणा गेल्यावर
पायली पायलीने फेडतो.

कालच लेकरू मोठ होत
पत्ता इचारत येत
बापाला झिजलेल पायताण दाखवत
धुळीच कारण देत.

नंतर आठवडायचे महीने
अन माहीन्यांचे साल होतात
त्याच्या मार्गावरील सर्व वाहन
खाली हात परततात.

No comments:

Post a Comment