Tuesday, October 5, 2010

आगरी-कोळी माणूस २०२० मध्ये

मुंबई,नवी मुंबई,रायगड,ठाणे येथील आगरी-कोळी माणसाचे मेणाचे पुतळे म्युझीअम मध्ये ठेवले गेले होते. शाळेतील मुले ते पाहायला आली होती आणि विचारत होती.

विद्यार्थी : हा माणूस कुठला गुरुजी?
गुरुजी : पहिल्याच्या काळी मच्छी पकडणारे व विकणारे अन शेती करणारे लोक इथे राहत होते, येथील ते आद्य रहिवासी(म्हणजे मूळ रहिवासी) होते.येथील जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या, ते लोक येथील समुद्राचे आणि जमिनीचे राजे होते, शिवाजी राजांनी देखील त्यांचा सन्मान केला होता, ते शूर होते.कान्होजी आंग्रे सारखा वीरपुरुष ज्याने पहिले आरमार बनविले ते त्यांच्याच वंशाचे होते.
विद्यार्थी: मग गुरुजी एवढा शूर माणूस आता कुठे गेला?
गुरुजी: ह्या माणसाने कधीच भविष्याचा विचार केला नाही, ह्या माणसाने आपले आयुष्य दारू, जुगार, आणि मौज मजा करण्यात फुकट घालवले.ह्या माणसाने आपले शौर्य आपसात लढण्यात घालवले.हा माणूस वाघ होता, वाघ कधीच कळपात राहत नाही तो एकटा राजा असतो. त्यामुळे त्याच्या कडे एकीचे बळ नसते गट बनवण्याचे फायदे त्याला कळत नाहीत आणि मग १०० कुत्रे मिळून वाघाला देखील खातात, त्याची देखील शिकार होते.भारतात वाघ जसे दुर्मिळ झालेत तसेच काळाच्या पडद्यात हा माणूस दुर्मिळ होत गेला आणि हरवला. सिंहासारखा जगला असता, कळप बनवून एकमेकांना सांभाळून राहिला असता तर मी आज तुम्हाला खरा आगरी-कोळी माणूस दाखवू शकलो असतो.

1 comment: